उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे |
प्रचलति यदि मेरुः  शीततां याति वह्निः |
विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां |
न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित् ||

- सूर्य एकवेळ पश्चिम दिशेला उगवेल, पर्वत जागचा हलेल , अग्नी थंड होईल , उंच पर्वतावरच्या टोकावर असलेल्या एका दगडावर कमळ उगवेल पण सज्जन माणूस आपला शब्द फिरविणार नाही .
गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा |
अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपपद्यते ||

- विद्या मिळविण्याचे तीनच मार्ग आहेत - गुरूची सेवा करून, पुष्कळ धन देऊन किंवा आपल्याजवळची विद्या दुसऱ्याला देऊन (दुसऱ्याला शिकवून किंवा आपले ज्ञान दुसऱ्याबरोबर वाटून ). ह्याव्यतिरिक्त चौथा कोणताच मार्ग नाही.

पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।
लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ।।

 - मुंग्यांनी साठवून ठेवलेले धान्य, मधमाशांनी साठविलेला मध आणि लोभी माणसाने साठविलेले द्रव्य यांचा संपूर्ण नाश होतोच.
लोभमूलानि पापानि रसमूलाश्च व्याधयः |
इष्टमूलानि शोकानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||

- पापाचे मूळ हे लोभात आहे . रोगांचे मूळ हे रसांमध्ये (जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चवींमध्ये) आहे. सतत कशाची तरी इच्छा धरणे हे दुःखाचे मूळ आहे. म्हणून ह्या तीनही गोष्टींचा त्याग करून सुखी व्हा.

यथा चित्तं तथा वाणी यथा वाणी तथा क्रिया |
चित्ते वाचि क्रियायां च साधूनाम् एकरूपता ||

- जे मनात आहे तेच बोलणे असते आणि जसे बोलणे तसेच वागणे असते. अशाप्रकारे चांगल्या माणसांचे मन, बोलणे आणि कृती यामध्ये एकरूपता असते. 
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं |
विरक्तस्य तृणं भार्या निःस्पृहस्य तृणं जगत् ||

- उदार माणसाला पैसा हा गवताप्रमाणे असतो. शूर माणसाला मरण गवताप्रमाणे असते . विरक्ताला बायको गवताप्रमाणे असते तर सर्व इच्छांमधून मुक्त झालेल्या माणसाला सगळे जगच गवताप्रमाणे असते. 
जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स क्रमः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ||

- पाण्याचा थेंब थेंब जमा होऊन घागर पूर्ण भरते. तशाच प्रकारे सर्व विद्या, धर्म (पुण्य) आणि धन देखील थोडे थोडे जमा होत त्याचा मोठा साठा होतो.
अर्थानामर्जने दुःखमर्जितानां च रक्षणे |
आये दुःखं व्यये दुःखं धिगर्थाः कष्टसंश्रयाः ||

- पैसा मिळवताना त्रास असतो. मिळालेला पैसा जतन करताना त्रास होतो. पैसा आला तरी दुःख खर्च झाला तरी दुःख. अशाप्रकारे कायम त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या पैशाचा धिक्कार असो.


विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् |
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ||

-  विद्या असली की अंगी विनय येतो. विनयामुळे पात्रता (लायकी) येते. ती आली की धन मिळते . धनामुळे धर्मानुसार (आयुष्य जगण्याची पद्धत, पार पडायची कर्तव्ये या अर्थाने) जगता येते आणि त्यामुळे सुख मिळते.