अखिलेषु विहङ्गेषु हन्त स्वच्छन्दचारिषु |
शुक, पञ्जरबन्धन्ते मधुराणां गिरां फलम् ||

- अरे पोपटा, सर्व पक्ष्यांमधे मोकळेपणाने इकडे तिकडे फिरणार्या तुझ्या वाट्याला जो बंदीवास आला आहे, तो तुझ्या मधुर बोलण्यामुळेच
माणसामधे इतरांना आनंद देणारा गुण असला की लोक त्याचा विचार न करता फायदा घेऊ बघतात.
क्षमातुल्यं तपो नास्ति ,न संतोषात् परं सुखम् |
तृष्णाया: परो व्याधिः , न च धर्मो दयापरः ||

- क्षमेसारखे दुसरे तप नाही, समाधानापेक्षा दुसरे सुख नाही, तहानेसारखी (लोभासारखी) दुसरी व्याधी नाही आणि दयेसारखा दुसरा धर्म नाही.
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||

- सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी , धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो.
(हा कृष्णाने अर्जुनाला गीतेत केलेला उपदेश आहे)
कस्तुरी जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम् |
भीरू किं कुर्वीत युद्धे , मृगात् सिंहः पलायते ||

- हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे. शेवटच्या चरणाचा अर्थ होतो - हरिणापासून सिंह दूर पळतो. पण हे कसे शक्य आहे? आधीचे तीन चरण वाचल्यावर त्याचा अर्थ लागतो - कस्तुरी कोणापासून मिळते ? - हरिणापासून , शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह आणि भेकड माणूस युद्धात काय करतो? - पळतो. अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत.
याकुन्देन्दुतुषारहारधवला याशुभ्रवस्त्रावृता
यावीणावरदण्डमन्डितकरा याश्वेतपद्मासना |
याब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा ||

- जिने कुन्दकळ्यांचे पांढरेशुभ्र हार घातले आहेत, जिने श्वेतवस्त्र धारण केले आहे, जिच्या हातात वीणेचा दंड शोभून दिसतो आहे, जी श्वेत कमळाच्या आसनावर बसली आहे ,ब्रह्मा विष्णु आणि महेश यांसारख्या देवांना जी सदैव वंदनीय राहिली आहे अशी देवी सरस्वती माझ्यावर प्रसन्न होवो आणि माझ्या बुद्धीचे जड़त्व दूर करो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |
न क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||

- ह्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही आणि वारा ओढून घेऊ शकत नाही.
(हे आत्म्याचे वर्णन आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार आत्मा अविनाशी समजला जातो)
पृथिव्यां त्रीणी रत्नानि , जलमन्नं सुभाषितम् |
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधियते ||

- पाणी, अन्न आणि सुभाषिते ही तीन रत्ने या पृथ्वीवर असताना मूर्ख लोक मात्र दगडांनाच रत्न म्हणतात.
अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति |
मलये भिल्लपुरन्ध्री: चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते ||

- अति सहवासाने एखाद्या गोष्टीचे मोल समजत नाही.एखाद्या ठिकाणी सतत गेल्याने अपमान होतो.मलय पर्वतावर रहाणारी भिल्लाची स्त्री चंदनाच्या लाकडाचा उपयोग जळणासाठी करते.
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव

- केशव (कृष्ण) पाण्यात पडलेला पाहून पांडवांना आनंद झाला आणि कौरव मात्र , "हे केशवा,हे केशवा" असा मोठ्याने आक्रोश करू लागले.

ह्या श्लोकाचा वरीलप्रमाणे अर्थ लावला तर तो विसंगत वाटतो कारण कृष्ण कायम पांडवांच्या बाजूने होता.असे असताना तो युद्धात पडल्यावर त्यांना आनंद कसा होईल? पण ह्या श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणे लावला तर बरोबर लागतो.

केशव = के + शव = पाण्यात पडलेले प्रेत
पांडव = पंडू (पांढऱ्या) रंगाचे = बगळे
कौरव = "कौ" असा रव ( आवाज) करणारे = कावळे
म्हणजेच पाण्यात पडलेले प्रेत पाहून बगळ्यांना खूप आनंद झाला (कारण त्यांना ते खाता येईल) आणि कावळे मात्र दु:खाने ओरडू लागले,"अरेरे, प्रेत पाण्यात पडले,प्रेत पाण्यात पडले".(कारण आता त्यांना ते खाता येणार नाही)
कन्या वरयते रुपं,माता वित्तं,पिता श्रुतम् ।
बान्धवाः कुलमिच्छन्ति, मिष्टानमितरेजनाः ||

- (लग्न करताना) मुलगी वराचे रूप कसे आहे हे पहाते, मुलीची आई वराकडे पैसा किती आहे हे बघते, मुलीचे वडील वर किती शिकलेला आहे हे बघतात, इतर नातेवाईक वर चांगल्या कुळातील असावा अशी अपेक्षा करतात आणि बाकीचे लोक मात्र लग्नात स्वादिष्ट जेवण मिळावे एवढीच अपेक्षा करतात.
अशनं मे , वसनं मे,जाया मे, बन्धुवर्गो मे ।
इति मे मे कुर्वाणं, कालवृको हन्ति पुरुषाजम्‌ ॥

- अन्न माझे, वस्त्रे माझी, बायको माझी आणि नातेवाईक माझे असे सतत माझे ,माझे (मे, मे) करणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा मारून टाकतो.

हा काव्यशास्त्रविनोदाचा एक प्रकार आहे. संस्कृतमध्ये मे म्हणजे माझे, तसेच बोकड मे मे असा आवाज करतो याचा उपयोग करून येथे "मे" वर श्लेष (pun) केला आहे.सतत "माझे माझे" करणाऱ्या माणसाला बोकडाची उपमा दिली आहे आणि त्याला शेवटी काळ धडा शिकवितो असे सूचित केले आहे.
रामाभिषेके जलमाहरन्त्या ,
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दम्‌,
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

- रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणताना एका तरुणीच्या हातातील सोन्याचा घडा खाली पडला (आणि) (तो) जिन्यावरून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज करत गेला.

हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे.यात शेवटची ओळ दिलेली असते आणि त्याला सुसंगत अशा पहिल्या तीन ओळी बनवणे अपेक्षित असते. कवीच्या शिघ्रकवीत्वाचा यात पुरेपूर कस लागतो.वरील श्लोकात ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ही ओळ समस्यापूर्तीसाठी दिलेली आहे. कवी कालीदास अशा समस्यापूर्ती करण्यामधे अतिशय पारंगत होता.
दधि मधुरम्‌ , मधु मधुरम्‌ ,द्राक्षा मधुरा,सुधापि मधुरमैव ।
तस्य तदेवही मधुरम्‌, यस्य मनो यत्र संलग्नम्‌ ॥

- दही गोड असते, मध गोड असतो,द्राक्षे गोड असतात आणि अमृत देखील गोड असते.
पण ज्याचा(एखाद्या माणसाचा) जीव जिथे जडला असेल, तेच त्याला गोड वाटते.
द्राक्षा म्लानमुखी जाता,शर्करा चाश्मताम्‌ गता ।
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवङ्गता ॥

- सुभाषितांच्या रसाळपणापुढे द्राक्षे म्लान (मलूल) झाली, साखर गोठून तिचा खडा बनला आणि अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले.(सुभाषितांची गोडी ह्या सर्वांपेक्षा जास्त आहे.)
गच्छ सूकर,भद्रं ते,वद ’सिंहो मया हत:’।
पण्डिता एव जानन्ति सिंहसूकयोर्‌ बल‍म्‌॥

- हे डुकरा,चालता हो, तुझे कल्याण असो."मी सिंह मारला" असे तू खुशाल सांग. (प्रत्यक्षात) सिंह आणि डुक्कर यांचे बळ किती हे सूज्ञ माणसे जाणतातच.
पिता रत्नाकरोर्यस्य लक्ष्मीर्यस्य सहोदरी I
शंखो रोदिति भिक्षार्थे फलम् भाग्यानुसारत: II

- ज्याचा पिता रत्नाकर (खूप रत्ने असलेला म्हणजेच समुद्र) आहे आणि लक्ष्मी ज्याची बहीण आहे अशा शंखाला (शंख आणि लक्ष्मी हे दोघेही समुद्रातून उत्पन्न झाले अशी एक पौराणिक कथा आहे) मात्र भिक्षा मागत रडावे लागते , म्हणजेच शेवटी प्रत्येकाला आपल्या भाग्याप्रमाणे (कर्माप्रमाणे) फळ मिळते (जन्माप्रमाणे नाही).
गजभुजङ्गमयोरपि बन्धनं शशिदिवाकरयोर्ग्रहपीडनम्।
मतिमताञ्च विलोक्य दरिद्रतां, विधिरहो बलवानिति मे मति:II

- हत्तीला सापासारखा लहान प्राणी बांधून ठेवू शकतो (त्रास देऊ शकतो), सूर्य आणि चंद्राला ग्रह त्रास देतात (राहू आणि केतू या ग्रहांमुळे सूर्य आणि चंद्राला ग्रहण लागतं अशी समजूत होती).अशा बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी असलेली ही गरिबी (किंवा कमजोरी) पाहून शेवटी नशीब हेच सर्वात बलवान आहे असं मला वाटतं.(थोडक्यात, आपल्या शक्तीचा कोणीही गर्व करू नये कारण इतक्या बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांचे देखील नशीबापुढे काही चालत नाही)