पृष्ठे

काममय एवायं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥

- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते तसेच तुम्ही होता .कारण जशी तुमची इच्छा असेल तशीच तुमची ताकद असते ,जशी ताकद असते तसेच काम तुमच्या हातून होते आणि जसे काम तुम्ही करता त्यावरच तुमची नियती (भवितव्य) ठरते .
न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥

- केवळ केस पांढरे झाले आहेत (वयाने मोठे आहेत) म्हणून आदर मिळत नाही तर तरुण असूनही जे उत्तम शिकलेले, ज्ञानी आहेत त्यांनाच देव मोठे (आदरणीय) समजतात.
अगाधजलसंचारी गर्वं नायाति रोहितः ।
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥

- विशाल अशा (समुद्राच्या) पाण्यात राहून देखील रोहित माशाला (एकप्रकारचा मोठा मासा) (आपल्या शक्तीचा ) गर्व नसतो.छोट्याश्या डबक्यात रहाणारी बारीक शफरी मासोळी मात्र उगीचच उड्या मारत असते.
थोडक्यात - उथळ पाण्याला खळखळाट फार.
सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया |
यस्य न द्रवते चित्तं स वै मुक्तोऽथवा पशुः ||

- सुभाषिते , गाणे आणि सुंदर तरुणींच्या लीला बघून ज्याचे ह्रदय प्रफुल्लित होत नाही तो एकतर (सर्व इच्छा ,वासना यातून) मुक्त तरी झालेला आहे किंवा पशु तरी आहे .
रथस्यैकं चक्रं भुजगयामिता: सप्ततुरगाः
निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि |
रविर्यात्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः
क्रियासिधिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे ||

- रथाला एकच चाक आहे, रथ हाकणारे साती घोड़े सापाने वेढलेले आहेत, काहीही आधार नसलेला रस्ता आहे आणि रथाचा सारथी एका पायाने अधू आहे, अशा सगळ्या अडचणी असताना देखील सूर्य अनंत अशा आकाशातून रोज मार्गक्रमण करीत असतो. महान लोकांची कार्यसिद्धी खरोखर त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांवर अवलंबून नसून त्यांच्या स्वतःच्या आतील शक्तीवर असते.
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ||

- अग्नी जेव्हा (वणव्याच्या रुपात) अख्खे जंगल नष्ट करतो तेव्हा वारा त्याला मित्राप्रमाणे मदत करतो.पण तोच वारा दिव्याच्या (म्हणजेच परत अग्नीच्या) मात्र नाशाला (दिवा विझवून टाकायला) कारणीभूत होतो.म्हणजे कोणी कोणाचा मित्र नसतो (हेच खरे).
वसन्ति कानने वृक्षाः फलपुष्पैश्च भूषिताः |
आम्रं विना परं चित्तं कोकिलस्य न तुष्यति ||

- वसंतॠतूमध्ये अरण्यातील वृक्ष फळाफुलांनी बहरून गेलेले असतात .पण कोकिळेचे मन मात्र आंब्याशिवाय संतुष्ट होत नाही.
ह्याला अन्योक्ती प्रकारचे सुभाषित म्हणता येईल. आजूबाजूला कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी काही लोकांचे मन एकाच विशिष्ट गोष्टीत गुंतून पडलेले असते आणि तिच्याशिवाय त्यांना खरा आनंद होत नाही.
सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||

- सोन्याची कमळे निर्माण करणारे अनेक शिल्पकार असतात. परंतु सुवासिक कमळे निर्माण करण्याचे कौशल्य फक्त ब्रह्मदेवाकडेच (चतुरानन = चार तोंडे असलेला म्हणजेच ब्रह्मदेव) असते.
साधोः प्रकोपितस्यापि मनो नायाति विक्रियाम्।
न हि तापयितुं शक्यं सागराम्भस्तृणोल्कया ||

- जसे समुद्राचे पाणी केवळ वाळलेले गवत वापरून तापत नाही तसेच इतर लोकांनी कितीही दबाव आणला तरीही द्रष्टया माणसांचे मन आपल्या योग्य निर्णयापासून ढळत नाही.
आरभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: |
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारभ्य चोत्तमजना: न परित्यजन्ति ||

- कामात अडथळे येतील या भीतीने कामच सुरू न करणारे लोक नीच (अतिशय कमी) प्रतीचे , काम चालू असताना मधेच अडथळे आले तर ते अर्धवट सोडून देणारे लोक मध्यम प्रतीचे तर कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून पुन्हा पुन्हा काम सुरू ठेवणारे लोक अतिशय उत्तम प्रतीचे असतात.
लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
नतु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ||

- प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, तहानेने व्याकूळ झालेला आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्याला एखाद्या वेळेस सशाचे शिंगही सापडेल. (अशा सर्व अशक्य वाटणार्या गोष्टीही कदाचित साध्य होतील) पण मूर्ख आणि हेकेखोर माणसाची समजूत कधीही घालता येणार नाही.