पृष्ठे

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
नतु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ||

- प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, तहानेने व्याकूळ झालेला आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्याला एखाद्या वेळेस सशाचे शिंगही सापडेल. (अशा सर्व अशक्य वाटणार्या गोष्टीही कदाचित साध्य होतील) पण मूर्ख आणि हेकेखोर माणसाची समजूत कधीही घालता येणार नाही.

४ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...

> कदाचिदपि पर्यटञ् शशविषाणमासादयेत्
>---

ही ओळ 'कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्' अशी हवी.
पर्यटन्‌ + शश... अशी ती सन्धी आहे. 'पर्यटञ्‌' असा शब्द संस्कृतात नाही. पृथ्वीछन्दातला आठव्या वर्णावरचा यति दाखवायला 'पर्यटन्‌' हा शब्द वेगळा दाखवण्याचा मोह झाला असावा. पण या सुभाषितात कुठल्याच ओळीत यति व्यवस्थित पाळलेला नाही.

'पर्यटञ्‌' शब्द वाचल्यावर मला वाटले की 'ञ्‌' हे व्यंजन दुसर्‍या व्यंजनाच्या आधी न आलेल्या मोज़क्या शब्दांपैकी हा शब्द असावा. असे चार शब्द मला आठवले. पण तो भ्रमाचा भोपळाच कसा ठरला, हे आता पाहू. पञ्जाब, पाञ्चजन्य, सञ्जय असे ञ्‌ या सानुनासिक व्यंजनानन्तर 'च' वर्गातले व्यंजन आलेले अनेक शब्द आहेत. पण त्या व्यंजनाबरोबर सम्पणारे (पर्यटञ्‌) वा त्या व्यंजनानन्तर दुसरे व्यंजन न येता स्वर आलेले (याच्ञा) शब्द आपल्याला इथे पहायचे आहेत. तो 'याच्ञा' हा शब्द अनेक ठिकाणी 'याञ्चा' असा चुकीचा लिहिल्या ज़ातो, हा भाग वेगळा. ज्‌ञानेश्वर, सम्राज्‌ञी हे शब्दही सर्वांच्याच माहितीचे आहेत. त्यांचा उच्चार आपण 'ग्य' वा 'द्‌न्य' करतो हा भागही वेगळा. माधवराव पटवर्धन म्हणतात की त्या शब्दांचा वेदकालीन उच्चार आज़ कोणालाच माहीत नसेल. पण ज्‌+ञ्‌ हा प्रयोग सोडल्यास 'ञ्‌'नन्तर स्वर आलेले वा ञ्‌ वर संपलेले किती शब्द आहेत? अशा शंकांबाबत मी नेहमीच माझा विद्‌वान मित्र सुशील शर्मा याच्याकडे धाव घेतो. मला वाटले की संस्कृत भाषा न समज़णार्‍या, न आवडणार्‍या, त्या भाषेत नगण्य म्हणावे लागेल इतके कमी वाचन असलेल्या माझ्यासारख्याला १०-२० पद्‌य चरणांद्‌वारे असे ४ शब्द कळले असतील तर त्या भाषेत तर अशा अनेक शब्दांची रेलचेल असेल. भोपळा चांगलाच फुगू लागला होता.

१) शंकराचार्य म्हणतात : न हि न हि रक्षति डुकृञ्‌ करणे. सुशीलराव सांगते झाले की संस्कृत भाषेत 'डुक्‌ऋञ्' असा शब्दच नाही. इंग्रजीत ज़से H2O, NaCl हे शब्द नाहीत, तसा तो 'डुकृञ्‌' हा शब्दप्रयोग आहे. त्याची उत्पत्ति गुंतागुंतीची आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण मला फारसे कळले नाही.
२) भर्तृहरिच्या वेच्यात 'पर्यटञ् शश...' असा प्रयोग नाहीच, हे आपण पाहिले आहेच. टन्‌-शश = टंछश... संधीत तो ञ्‌ हा छ्‌ ला टेकू म्हणून आला आहे.
३) माझ्याज़वळच्या शिवमहिम्नाच्या एका प्रतीत 'स्तुवञ्‌ जिह्‌रेमि त्वाम्‌' असा नवव्या श्लोकात उल्लेख आहे. तो ही चूक आहे. पुष्पदन्त गंधर्वाचे शब्द आहेत : 'स्तुवन्‌ + जिह्रेमि' = 'स्तुवञ्जिह्‌रेमि'.
असे 'ञ्‌' चे तीन प्रयोग ज्‌ञानेश्वराञ्च्या ज़ात्याच्या आणीवरल्या तीन गावांसारखे निघाले. दोन चुकीचे, तिसरा संस्कृत भाषेत असेचि ना.

राहता राहिला कालिदासाच्या मेघदूतात आलेला शब्द : याच्‌ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा .
त्या सुन्दर ओळीबद्‌दल पुढे कधी तरी, केव्हा तरी.

- डी एन

अनामित म्हणाले...

या सुभाषिताबद्‌दल लगेच ज़ाणवणारी गोष्ट ही की मराठीत याचे भाषान्तर करताना (प्रयत्‌ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे) वामन पंडिताला 'शिखरिणी' छन्द सुचला. मूळ वचनात भर्तृहरीनी पृथ्वी हा छन्द वापरला आहे.

सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते - या सुभाषिताचे भाषान्तर करताना मात्र वामनानी मूळचा शार्दूलविक्रीडित हा गणछन्दच कायम ठेवला आहे.

तोयाचे परि नाव ही न उरते सन्तप्त लोहावरी

दोन्ही सुभाषिते (मूळ संस्कृत आणि मराठी रूप) निव्वळ अप्रतिम आहेत.
पहा : http://sanskritdocuments.org/doc_z_misc_subhaashita/subhaashhita_kedar_unic.html

- डी एन

अनामित म्हणाले...

दोन चुका सुधारायला हव्यात.
परि/परी काहीही चालेल. पण री-रि यमकापेक्षा री-री अशी री ओढलेली जास्त चांगली. ठळक छन्दहानी टाळण्यासाठी आणि योग्य रूप वापरण्यासाठीही आवश्यक बदल म्हणजे, अह -> अहा, पुटकि -> पुटकी.

तोयाचे परि नाव ही न उरते सन्तप्त लोहावरी
ते भासे नलिनीदलावरि अहा! सन्मौक्तिकाचे परी |
ते स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके
जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्गयोगे टिके ||

आश्लेषा म्हणाले...

@Naniwadekar - धन्यवाद. दुरुस्ती केली आहे .