पृष्ठे

अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च।
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं कारयेत् ||

- शिल्लक राहिलेली आग , शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक असलेला शत्रु हे पुन्हा पुन्हा बलवान होऊ शकतात (आणि त्रास देऊ शकतात) म्हणून ह्या गोष्टी कधीही थोड्यादेखील शिल्लक ठेवू नयेत.
अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला ||

- पैशाच्या मागे लागलेला माणूस गुरू काय किंवा भाऊ काय काहीही जाणत नाही, कामविव्हल माणसाला ना कशाची भीती असते ना लाज, विद्येच्या मागे असलेल्या माणसाला कधीही सुख (समाधान) आणि झोप नसते , भुकेलेल्याला वेळेची किंवा अन्नाच्या चवीची पर्वा नसते.
कश्चित् कस्यचित् मित्रं कश्चित् कस्यचित रिपुः।
कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवोऽपि वा ||

- (मुळात) कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रु नसतो .काही कारणामुळेच लोक एकमेकांचे मित्र किंवा शत्रु होतात.
को याति वशं लोके मुखे पिण्डेनपूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वानिम् ||

- या जगात तोंडात काही घातल्यावर (कुठलीही लाच दिल्यावर) कोण वश होत नाही? मृदुंग देखील त्याच्या तोंडाला लेप लावल्यावरच मधुर आवाज काढतो
उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ||

- उद्योग (प्रयत्न) केल्यानेच कामे पूर्ण होतात नुसती स्वप्ने बघून नाही .झोपलेल्या सिंहाच्या जबड्यात हरणे स्वत:हून प्रवेश करीत नाहीत.(सिंहाला त्यांची शिकार करावीच लागते.)
अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणम्।
चातुर्यम् भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम् ||

- वेग हे घोड्याचे भूषण आहे, माज हे हत्तीचे भूषण आहे, चातुर्य हे स्त्रियांचे भूषण आहे आणि उद्योग हे पुरुषांचे भूषणआहे.