पृष्ठे

नास्ति शत्रुः प्रकृत्यैव न च मित्रं कदाचन |
सुखदं मित्रमित्युक्तं दुःखदाः शत्रवः स्मृताः ||

-  मुळात कोणीच आपला शत्रू नसतो आणि कोणी कधी मित्रही नसतो. आपल्याला सुख देणाऱ्याला आपण मित्र म्हणतो आणि आपल्याला दुखः देणारे शत्रू समजले जातात.
षड् दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ||

- आपल्या कल्याणाची / यशाची अपेक्षा करणाऱ्या माणसाने हे सहा दोष टाळावेत - झोप, सुस्ती, भीती, राग, आळस आणि (कोणत्याही कामाला) विलंब लावणे.


नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्
नष्टा विद्या लभ्यतेsभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ||

- गेलेले धन कष्ट करून परत मिळविता येते. गेलेली विद्या (अज्ञान) अभ्यास करून प्राप्त करता येते.  नष्ट झालेले आरोग्य चांगल्या उपचारांनी परत मिळते पण एकदा जी वेळ गेली ती गेलीच.
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ||
आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासि धारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् ।।

- योगाच्या सहाय्याने मनातला, व्याकरणाने वाणीतला आणि वैद्यकशास्त्राने शरीरातला मळ ज्यांनी दूर केला अशा त्या श्रेष्ठ पतंजली मुनींना मी हात जोडून प्रणाम करतो.
ज्यांच्या शरीराचा वरील भाग पुरुषाचा आहे आणि ज्यांनी शंख व चक्र धारण केले आहे अशा हजार तेजस्वी मुखे असलेल्या पतंजली ऋषींना मी प्रणाम करतो.

गुणायन्ते दोषाः सुजनवदने दुर्जनमुखे |
गुणा दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ||
महामेघः क्षारं पिबति कुरुते वारि मधुरम्
फणी पीत्वा दुग्धं वमति गरलं दुःसहतरम् ||

- सज्जन माणसाच्या मुखी दोष देखील गुण बनतात तर दुर्जन माणसाच्या मुखी गुण दोषाच्या रुपात प्रकट होतात ह्यात आश्चर्य काहीच नाही. ढग खारट पाणी पितात आणि मधुर असा पाऊस पाडतात तर साप मात्र दूध पिऊनदेखील अतिशय दुःसह असे विषच ओकतो.

जीवन्तु मे शत्रुगणाः सदैव
येषां प्रसादत्सुविचक्षणोSहम् |
ये ये यथा मां प्रतिबाधयन्ति
ते ते तथा मां प्रतिबोधयन्ति ||

- ज्यांच्या कृपेने मी एवढा हुशार झालो आहे असे माझे सर्व शत्रू कायम जगोत (कारण) जसे जसे ते मला अडथळा आणतात तसे तसे ते मला अजूनच शहाणे करतात. 
ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्म प्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद् द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||

- कोणतेही काम न करता नुसतेच ज्ञान असेल तर ते महत्त्वाचे ठरत नाही. तसेच कोणत्याही ज्ञानाशिवाय एखादे काम केले तर ते बिनमहत्त्वाचे असते. म्हणून ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी यश (साध्य) मिळविण्यासाठी महत्त्वाच्या असतात. नुसत्याच एका पंखाच्या बळावर पक्षी उडू शकत नाही.
यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य |
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद् वहन्ति ||

- ज्याप्रमाणे चंदनाचे नुसते ओझे वाहून काही गाढव चंदनाचे होत नाही त्याप्रमाणेच एखाद्याने कितीही शास्त्रांचे  अध्ययन केले तरी त्याचा अर्थ माहीत नसेल तर त्याची अवस्था गाढवाप्रमाणेच (ओझे वहाणाऱ्याची) होते.