पृष्ठे

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं, हारा न चंद्रोज्वलाः
न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजा: |
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ||

- माणसाला केयूरामुळे (दंडावरील अलंकार) शोभा येत नाही किंवा चंद्राप्रमाणे तेजस्वी हाराने देखील नाही. स्नान केल्याने, सुगंधी द्रव्याने मालिश केल्याने, फुलांमुळे किंवा केस सुशोभीत केल्याने सुद्धा नाही.सुसंस्कृत वाचा (बोलणे) माणसाला अलंकृत करते. इतर सर्व अलंकार हळू हळू नष्ट होत जातात पण उत्तम वाचा हे खरे भूषण आहे (कारण ते कायम बरोबर रहाते).
शरदि न वर्षति, गर्जति, वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः |
नीचो वदति, न कुरुते, वदति न सुजनः, करोत्येव ||

- शरद ॠतू मधील ढग नुसतेच गरजतात पण बरसत नाहीत.याउलट वर्षाॠतूतील ढग अजिबात आवाज करीत नाहीत आणि पाऊस पाडतात.(तसेच) नीच लोक नुसतेच बोलतात करत काहीच नाहीत.सज्जन लोक मात्र न बोलता कृती करतात.(गरजेल तो पडेल काय)

दुर्जनः परिहर्तव्यो विद्यया भूषितोऽपि सन् |
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ||

- दुष्ट माणूस कितीही विद्याविभूषित असला तरीही त्याला टाळणेच उत्तम. अलंकाराने नटलेला असला तरीही साप भयंकर नसतो काय?

योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत्पिपीलिका |
अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति ||

- हळू हळू चालत मुंगी हजारो योजने अंतर पार करून जाते. पण जागचा हललाच नाही तर गरुड़ एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही.
अर्थात, तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा उपयोगच केला नाही तर त्या क्षमतेला काही अर्थ नसतो.
अग्निदाहे न मे दुःखं छेदने निकषे न वा |
एतदेव महद्दुःखं गुञ्जया सह तोलनम् ||

- सोने म्हणते - मला आगीमध्ये तापविल्याने, तोडल्याने किंवा कस ठरविण्याने (त्यासाठी दगडावर घासल्याने)दुःख होत नाही.पण मला गुंजेसारख्या निकृष्ट प्रतीच्या पदार्थाबरोबर तोलले जाते याचे मात्र अतिशय दुःख होते.

ही सुवर्णान्योक्ती आहे . सोन्याला इतर कोणत्याही त्रासाचे दुःख वाटत नाही पण अपमानाचे वाटते.तसेच थोर माणसे कोणतेही दुःख सहन करतील पण त्यांना अपमानाचे दुःख असह्य होते.
वृक्षस्याग्रे फलं दृष्टं फलाग्रे वृक्षमेव च |
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः ||

- झाडाच्या टोकाला फळ आहे आणि फळाच्या टोकाला परत झाड आहे. त्याची सुरुवात "अ' ने होते तर शेवटी "स" आहे.हे जो ओळखेल तो खरा पंडित.(उत्तर - अननस)


उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा |
सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||

- उगवताना सूर्य लाल असतो तसाच तो मावळतानाही लाल असतो. अशाप्रकारे महान (थोर) लोक समृद्धीच्या आणि संकटाच्या अशा दोन्ही काळात एकसारखेच वागतात.

म्हणजेच संकटाने घाबरत नाहीत किंवा समृद्धीच्या काळात हुरळून जात नाहीत.
चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरं पिपासया |
सोSपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ||

- तहानेमुळे चातक पक्षी ढगांकडे फक्त तीन-चार पाण्याच्या थेंबांची याचना करतो .पण ढग मात्र सर्व विश्वच पाण्याने भरून टाकतो. काय ही मोठ्या माणसांची उदार वृत्ती !!
शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे |
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ||

- प्रत्येक पर्वतावर माणके सापडत नाहीत, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती नसतात, चंदनाचे झाड प्रत्येक अरण्यात नसते तसेच सज्जन माणसे सर्व ठिकाणी नसतात.
अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरज-मण्डितम् |
रमते न मरालस्य मानसं मानसं विना ||

- कमळांनी सुशोभित असे पाणी सर्व ठिकाणी असते .पण राजहंसाचे मन मात्र मानस सरोवराशिवाय इतर कुठेच रमत नाही.
गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः ||

- गेलेल्याचे दुखः करीत नाहीत आणि भविष्याची चिंता करीत नाहीत. बुद्धीमान लोक वर्तमानकाळात रहातात.
चिन्तनीया हि विपदां आदादेव प्रतिक्रिया |
न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे ||

- संकट आल्यावर करावयाच्या उपाययोजनेचा आधीच विचार करून ठेवला पाहिजे. घराला आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खणायला घेणे योग्य नाही.
नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता |
अमुखी कुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ||

- स्त्री आणि पुरुष यापासून तिची उत्पत्ती झाली असून त्या स्त्रीला देह नाही . तोंड नसूनही ती आवाज करते आणि जन्माला येताच नाश पावते ।

कोड्याचे उत्तर? - चुटकी- अंगठा (पुरुष) व मध्यमा (मधले बोट - स्त्री) यापासून चुटकी निर्माण होते. तिला स्त्रीदेह तर नसतोच पण तोंड नसूनही आवाज करते. तसेच वाजविल्या वाजविल्या संपते (एकावेळेस एकदाच वाजविता येते)
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भाया पुनर्मही |
एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः ||

- गेलेला पैसा, गेलेले मित्र, गेलेली बायको किंवा जमीन (जागा) हे सर्व परत मिळू शकते. पण एकदा गेलेले शरीर मात्र परत मिळत नाही.
यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते |
तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलम् ||

- जसे एका हाताने टाळी वाजत नाही तसेच उद्योग न करता केवळ कर्माच्या (नशिबाच्या) जोरावर फळ मिळत नाही.
वातोल्लासितकल्लोल धिक् ते सागरगर्जनम् |
यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकम् ||

- वार्यामुळे ज्यावर पाण्याच्या लाटा उसळत आहेत आणि तरीही ज्याच्या किनार्यावर तहानलेले प्रवासी विहिरीची चौकशी करतात अशा समुद्रा, तुझा धिक्कार असो.
घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारुगन्धम्
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम् |
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णम्
प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||

- चंदन पुन्हा पुन्हा कितीही वेळा उगाळले तरी सुवासच पसरविते , उसाचे कितीही बारीक बारीक तुकडे केले तरी तो गोडच लागतो, सोने आगीत कितीही वेळा जाळले तरी ते झळाळूनच उठते. कठीण परिस्थितीतदेखील उत्तम लोकांचे गुणधर्म बदलत नाहीत.