पृष्ठे

शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः
यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान् |
संचिन्तितं त्वौषधमातुरं हि
किं नाममात्रेण करोत्यरोगम् ||

- अनेक शास्त्रांचे अध्ययन करून देखील माणसे मूर्खच रहातात. जो प्रत्यक्ष कृती करतो तो खरा विद्वान होय. आजारी पडल्यावर औषधाचा कितीही विचार केला तरी नुसते औषधाच्या नावाने रोग बरा होत नाही. (जोपर्यंत औषध प्रत्यक्ष घेत नाही तोवर रोग बरा होत नाही)
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पद्यते हि मम कोSपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

- भवभूती (मालतीमाधव)

- जे कोणी आमच्याबद्दल वेडीवाकडी मते पसरवीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हे काव्य किंवा लिखाणाचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. कधीतरी माझे काव्य समजणारा कोणी समानधर्मी जन्माला येईलच. हा काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.
आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

- जेव्हा जे परत द्यायला पाहिजे तेव्हा ते द्यावे , जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते करावे. जे करायचे आहे ते लगेचच वेळेवर न केल्यास त्यातील सर्व रस काळ पिऊन टाकतो (नष्ट करतो)
भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतः
मा भैषीः कलश , स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि |
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेSधुना 
नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः ||

- अरे कळसा, बंधो, तू मूळचा तांब्याचा असून तुला केवळ बाहेरून सोन्याचा मुलामा दिला आहे म्हणून चिंता करू नकोस. देवळावर शांतपणे कायमचा रहा. तुझे तांब्याचे असणे मागे पडले असून आता तू सोन्याचाच आहेस अशी कीर्ती सर्वत्र पसरली आहे . आतले सत्त्व जाणून घेण्यात लोकांना फारसा रस नसतो. बाहेरून जे काही दिसेल त्यानुसारच ते आपले मत बनवितात .