पृष्ठे

दानं प्रियवाक्सहितं ज्ञानमगर्वं क्षमान्वितं शौर्यम् |
वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुर्विधं भद्रम् ||

- चांगले शब्द बोलून दिलेले दान (प्रिय असे बोलणारा दानी माणूस ), गर्वरहित ज्ञान ( नम्र विद्वान) , क्षमेने परिपूर्ण असे शौर्य (क्षमाशील शूर माणूस) आणि त्यागाची जोड असलेले धन ( त्याग करू शकणारा श्रीमंत) ह्या चार कल्याणकारी आणि तितक्याच दुर्मिळ गोष्टी आहेत. 
मरुस्थल्यां यथा वृष्टिः क्षुधार्ते भोजनं यथा ।
तथा दरिद्रे यद्दानं दीयते सफलं हि तत् ||

- ज्याप्रमाणे वाळवंटात झालेला पाउस, भुकेलेल्याला दिलेले जेवण हे योग्य असते त्याप्रमाणेच दरिद्री माणसाला जे दान दिले जाते ते सफल होते.

वर्णेन सौरभेणापि संपन्नं कुसुमं यथा |
क्रियया फलितं वाक्यं तथा लोके विराजते ||

- एखादे फूल ज्याप्रमाणे रंगामुळे आणि वासामुळे शोभून दिसते त्याप्रमाणेच कृतीची जोड असलेले (कृतीने सफल झालेले ) बोलणेच जगात शोभून दिसते.
अर्थात कृतीखेरीज नुसत्या बोलण्याला कोणी मान देत नाही. 
 न चौर्यहार्यं न च राज्यहार्यं
न भ्रातृभाज्यं न च भारकारि |
व्यये कृते वर्धत एव नित्यं
विद्याधनं सर्वधनप्रधानम् ||

- सर्व प्रकारच्या धनांमध्ये विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. कारण ना ते चोराला चोरता येते, ना राजा ते जप्त करू शकतो, त्याची भावंडांमध्ये वाटणी करता येत नाही, ते सांभाळायचे ओझेदेखील होत नाही आणि ते खर्च केल्याने ( दिल्याने) कायम वाढते. 
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः |
कालो न यातं वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ||
 - भर्तृहरी

- भोग भोगले जात नाहीत तर आपणच भोगले जातो (संपत जातो), आपण तप करीत नाही तर आपल्यालाच जाळले जाते, वेळ पुढे जात नाही तर आपणच खर्च होतो , इच्छा/वासना जीर्ण होत नाहीत आपणच जीर्ण होत जातो.