पृष्ठे

कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा।
दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

- पत्नीचा वियोग, आपल्या माणसांकडून झालेला अपमान ,शिल्लक राहिलेले कर्ज ,वाईट राजाची (मालकाची) सेवा करावी लागणे आणि दारिद्र्यात पाठ फिरविलेले मित्र ह्या पाच गोष्टी माणसाला कायम अग्नीशिवायच जाळतात.
न राज्यम् न च राजाः असीत् न दण्डयो न च दाण्डिकः ।
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्मः परस्परम् ||

- आदर्श समाजव्यवस्थेत ना कोणी राजा असतो , ना त्याचे राज्य असते.कोणी शिक्षा देणारा नसतो ,कोणी शिक्षा भोगणाराही नसतो. सर्व लोक धर्माने वागतात (आपल्या कर्तव्याचे नीट पालन करतात) आणि एकमेकांचे रक्षण करतात.
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः |
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||

- रात्र संपेल , पहाट होईल , सूर्य उगवेल ,कमळे हसू लागतील (फुलतील) आणि मी येथून बाहेर पड़ेन असा विचार रात्री कमळ मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा करीत आहे .पण अरेरे! काय हे दुर्दैव ! ते कमळ(च) हत्तीने उपटले.
लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

- मुलगा पाच वर्षांचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत, नंतरची दहा वर्षे त्याला मारून (थोड़ा धाक दाखवून) शिस्त लावावी पण एकदा का तो सोळा वर्षांचा झाला की त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे.