पृष्ठे

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक्ताञ्च तं च मदनं च इमां च मां च ||

-मी जिचा सतत विचार करतो ती माझ्याबाबतीत विरक्त आहे, तिला दुसराच कोणी आवडतो आणि त्याला अजून वेगळीच कोणीतरी आवडते. अजून तिसरीच कोणीतरी माझी अभिलाषा धरून आहे .तिचा ,त्याचा ,मदनाचा ,त्या स्त्रीचा आणि माझाही धिक्कार असो.
रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्बोधा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

- हे चातक पक्ष्या, सावध होऊन एक क्षणभर ऐक. आकाशात खूप सारे ढग आहेत ,पण सर्वच एकसारखे नाहीत. त्यापैकी काहीच ढग पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करणारे आहेत तर काही विनाकारण गर्जना करणारे पण पाऊस न पाडणारे आहेत. म्हणून जो जो ढग दिसेल त्याच्याकडे पाण्याची याचना करत फिरू नकोस.
हे अन्योक्ती प्रकारातले सुभाषित आहे. या प्रकारात मानव सोडून इतर कोणालातरी (जसे चातक, मोर ,बगळा इत्यादी) व्यवहारातील उपदेश असतो पण तो माणसालाही वेगळ्या संदर्भात लागू पडतो. जसे वरील सुभाषितातून, माणसाने आपल्याला खरंच मदत करणारे कोण आणि नुसत्याच वल्गना करणारे कोण हे नीट ओळखून त्याप्रमाणे वागावे असा अर्थ लावता येतो.
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः |
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ||

- प्रत्येक माणसाची बुद्धी (विचार) वेगळा, प्रत्येक सरोवरातील पाणी वेगळे , प्रत्येक जातीत असलेले आचार (वागण्याची पद्धत) वेगळे आणि प्रत्येक मुखातून बाहेर पडणारे बोलणे वेगळे .
मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ||

- काळ्या असलेल्या केसांनी पांढरेपणा धारण केला, हे बघून तोंडातले दात चिडून निघून गेले.(कारण दातांचा पांढरे असण्याचा गुणधर्म केसांनी चोरला).
माणसाला म्हातारपण आल्याचे कल्पक वर्णन केले आहे.
यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् |
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ||

- ज्याला स्वतःची हुशारी नाही त्याला शास्त्र (विद्या) काय करणार? एखाद्याला डोळेच नसतील तर त्याला आरशाचा काय उपयोग?
यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा |
यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजस्तथांकुरः ||

- जसा देश तशी भाषा , जसा राजा तशी प्रजा , जशी जमीन तसेच (त्यातून बाहेर येणारे) पाणी आणि जसे बी असेल तसाच (त्याला येणारा) अंकुर असतो.
मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिकदंशनम् |
तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति ||

- माकडाने दारू प्यायली, त्यात त्याला विंचू चावला आणि शिवाय त्याच्या अंगात भूत शिरले तर जे काही व्हायचे ते (अनिष्टच) होईल.
अत्यंत हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी हे सुभाषित आहे.