पृष्ठे

यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैर्विज्ञानशौर्यविभवार्यगुणैः समेतम् |
तन्नाम जीवितमिति प्रवदन्ति तज्ज्ञाः काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुङ्क्ते ||
 
- एक क्षणभर जरी जगलो तरी ते जगणे ज्ञान , शौर्य आणि वैभव ह्या गुणांनी युक्त असावे यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे. विद्वानांच्या मते तेच खरे जगणे होय. नाहीतर पिंडाला दिलेला घास खाऊन कावळे देखील पुष्कळ जगतात.
कार्यापेक्षी जनः प्रायः प्रीतिमाविष्करोत्यलम् |
लोभार्थी शौण्डिकः शष्पैर्मेषं पुष्णाति पेशलैः ||

- एखादा लोभी खाटीक बकरा विकण्यापूर्वी त्याला कोवळे गवत खायला घालून उत्तम प्रकारे पोसतो. त्याप्रमाणेच एखाद्याला जेव्हा आपले काम करून घ्यायची इच्छा असते तेव्हा तो ज्याच्याकडून काम होण्याची शक्यता आहे त्याच्याशी अत्यंत गोड आणि प्रेमाने वागतो.
ददतो युद्धमानस्य पठतः पुलको न चेत् | 
आत्मनश्च परेषां च धिक् त्यागं पौरुषं श्रुतम् ||

- दान देताना , शत्रूशी लढताना आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना जर करणाऱ्याला आनंद मिळत नसेल तर अशा त्यागाचा, पौरुषाचा(शौर्याचा) आणि अभ्यासाचा काहीच उपयोग नाही. मग त्या गोष्टी न केलेल्याच उत्तम.