पृष्ठे

न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरङ्गो न कदापि दृष्टः।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥

- सोन्याचे हरीण याआधी ना कधी कोणी पाहिले ना कधी कोणी ऐकले. तरीही (अशक्य गोष्ट असूनही)रामाला त्याचा मोह झाला.विनाश जवळ आला असेल तर माणसाची बुद्धी फिरते हेच खरे.
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥

- क्षमा हे दुबळ्यांचे बळ आहे तर बलवानांचे भूषण आहे. क्षमा केल्याने सर्व जग वश होते.(अशाप्रकारे) क्षमेने काय साधत नाही?
यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती |
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती ||

- ज्या प्रकारे संगीत कैलास पर्वतापर्यंत नेते (येथे कैलास पर्वत हा अत्त्युच आनंद किंवा मोक्ष दर्शवत आहे ),त्या प्रकारे ना गंगा नेते ना सरस्वती .
यात संगीताचे महत्त्व सांगितले आहेच पण एका वेगळ्या प्रकारे.या सुभाषितातील दोन्ही ओळी पाहिल्या तर त्या सारख्याच आहेत असे दिसून येईल पण दोन्ही ओळींमध्ये शब्दांची फोड़ वेगळ्या प्रकारे केल्याने अर्थही वेगळा होतो.
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा।
विषं भवतु वा माऽभूत् फटाटोपो भयङ्करः ||

- साप विषारी नसला तरी त्याने फणा काढ़णे महत्वाचे आहे .विष असो वा नसों, उभारलेला फणा हा कायमच भयानक दिसतो.
आशा नाम मनुष्यणाम् काचिदाश्चर्यशृङ्खला |
यथा बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङगुवत् ||

-आशा ही अशी एक अजब साखळी आहे जिने बांधल्यावर माणूस धावत सुटतो आणि जिने सोडल्यावर पांगळ्याप्रमाणे एका जागी उभा रहातो.
अखिलेषु विहङ्गेषु हन्त स्वच्छन्दचारिषु |
शुक, पञ्जरबन्धन्ते मधुराणां गिरां फलम् ||

- अरे पोपटा, सर्व पक्ष्यांमधे मोकळेपणाने इकडे तिकडे फिरणार्या तुझ्या वाट्याला जो बंदीवास आला आहे, तो तुझ्या मधुर बोलण्यामुळेच
माणसामधे इतरांना आनंद देणारा गुण असला की लोक त्याचा विचार न करता फायदा घेऊ बघतात.
क्षमातुल्यं तपो नास्ति ,न संतोषात् परं सुखम् |
तृष्णाया: परो व्याधिः , न च धर्मो दयापरः ||

- क्षमेसारखे दुसरे तप नाही, समाधानापेक्षा दुसरे सुख नाही, तहानेसारखी (लोभासारखी) दुसरी व्याधी नाही आणि दयेसारखा दुसरा धर्म नाही.