पृष्ठे

आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

- जेव्हा जे परत द्यायला पाहिजे तेव्हा ते द्यावे , जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते करावे. जे करायचे आहे ते लगेचच वेळेवर न केल्यास त्यातील सर्व रस काळ पिऊन टाकतो (नष्ट करतो)
भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतः
मा भैषीः कलश , स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि |
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेSधुना 
नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः ||

- अरे कळसा, बंधो, तू मूळचा तांब्याचा असून तुला केवळ बाहेरून सोन्याचा मुलामा दिला आहे म्हणून चिंता करू नकोस. देवळावर शांतपणे कायमचा रहा. तुझे तांब्याचे असणे मागे पडले असून आता तू सोन्याचाच आहेस अशी कीर्ती सर्वत्र पसरली आहे . आतले सत्त्व जाणून घेण्यात लोकांना फारसा रस नसतो. बाहेरून जे काही दिसेल त्यानुसारच ते आपले मत बनवितात .
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन्द्रैः |
इति महति विरोधे वर्तमाने समाने
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ||

- राजाचे हित पहाणारा जो असतो त्याचा सामान्य लोक द्वेष करतात. लोकांचे हित पाहणारा राजाकडून दूर सारला जातो. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी सारखाच विरोध होत असताना राजा आणि प्रजा यांचे सारखेच हित पाहाणारा कार्यकर्ता दुर्लभ असतो.
अनेकशास्त्रं बहु वेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः |
यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

- शिकायला पुष्कळ शास्त्रे आहेत , खूप काही जाणण्यासारखे आहे पण काळ थोडा आहे आणि अडचणी भरपूर. म्हणून ज्याप्रमाणे हंस पाण्यापासून दूध वेगळे करून घेतो त्याप्रमाणे माणसाने जे काही सार असेल (उत्तम असेल) त्याची निष्ठेने उपासना करावी .
अफलानि दुरन्तानि समव्ययफलानि च |
अशक्यानि च वस्तूनि नारभेत् विचक्षणः ||

- निष्फळ होणारी, न संपणारी, केलेला खर्च आणि मिळालेले फळ सारखेच असणारी तसेच अशक्य असणारी कामे शहाण्या माणसाने हाती घेऊ नयेत.
निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलासः पयोगते किं खलु सेतुबन्धः ।।

-  दिवा विझल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग? चोर येऊन चोरी करून गेल्यानंतर सावधगिरी बाळगून काय उपयोग ? वय निघून गेल्यावर सुंदर स्त्रियांचा सहवास काय कामाचा? आणि पूर आल्यानंतर बांध घालून काय उपयोग?
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ती निघून गेल्यावर काही करून उपयोग नसतो.