पृष्ठे

केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव

- केशव (कृष्ण) पाण्यात पडलेला पाहून पांडवांना आनंद झाला आणि कौरव मात्र , "हे केशवा,हे केशवा" असा मोठ्याने आक्रोश करू लागले.

ह्या श्लोकाचा वरीलप्रमाणे अर्थ लावला तर तो विसंगत वाटतो कारण कृष्ण कायम पांडवांच्या बाजूने होता.असे असताना तो युद्धात पडल्यावर त्यांना आनंद कसा होईल? पण ह्या श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणे लावला तर बरोबर लागतो.

केशव = के + शव = पाण्यात पडलेले प्रेत
पांडव = पंडू (पांढऱ्या) रंगाचे = बगळे
कौरव = "कौ" असा रव ( आवाज) करणारे = कावळे
म्हणजेच पाण्यात पडलेले प्रेत पाहून बगळ्यांना खूप आनंद झाला (कारण त्यांना ते खाता येईल) आणि कावळे मात्र दु:खाने ओरडू लागले,"अरेरे, प्रेत पाण्यात पडले,प्रेत पाण्यात पडले".(कारण आता त्यांना ते खाता येणार नाही)
कन्या वरयते रुपं,माता वित्तं,पिता श्रुतम् ।
बान्धवाः कुलमिच्छन्ति, मिष्टानमितरेजनाः ||

- (लग्न करताना) मुलगी वराचे रूप कसे आहे हे पहाते, मुलीची आई वराकडे पैसा किती आहे हे बघते, मुलीचे वडील वर किती शिकलेला आहे हे बघतात, इतर नातेवाईक वर चांगल्या कुळातील असावा अशी अपेक्षा करतात आणि बाकीचे लोक मात्र लग्नात स्वादिष्ट जेवण मिळावे एवढीच अपेक्षा करतात.
अशनं मे , वसनं मे,जाया मे, बन्धुवर्गो मे ।
इति मे मे कुर्वाणं, कालवृको हन्ति पुरुषाजम्‌ ॥

- अन्न माझे, वस्त्रे माझी, बायको माझी आणि नातेवाईक माझे असे सतत माझे ,माझे (मे, मे) करणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा मारून टाकतो.

हा काव्यशास्त्रविनोदाचा एक प्रकार आहे. संस्कृतमध्ये मे म्हणजे माझे, तसेच बोकड मे मे असा आवाज करतो याचा उपयोग करून येथे "मे" वर श्लेष (pun) केला आहे.सतत "माझे माझे" करणाऱ्या माणसाला बोकडाची उपमा दिली आहे आणि त्याला शेवटी काळ धडा शिकवितो असे सूचित केले आहे.
रामाभिषेके जलमाहरन्त्या ,
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दम्‌,
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

- रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणताना एका तरुणीच्या हातातील सोन्याचा घडा खाली पडला (आणि) (तो) जिन्यावरून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज करत गेला.

हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे.यात शेवटची ओळ दिलेली असते आणि त्याला सुसंगत अशा पहिल्या तीन ओळी बनवणे अपेक्षित असते. कवीच्या शिघ्रकवीत्वाचा यात पुरेपूर कस लागतो.वरील श्लोकात ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ही ओळ समस्यापूर्तीसाठी दिलेली आहे. कवी कालीदास अशा समस्यापूर्ती करण्यामधे अतिशय पारंगत होता.
दधि मधुरम्‌ , मधु मधुरम्‌ ,द्राक्षा मधुरा,सुधापि मधुरमैव ।
तस्य तदेवही मधुरम्‌, यस्य मनो यत्र संलग्नम्‌ ॥

- दही गोड असते, मध गोड असतो,द्राक्षे गोड असतात आणि अमृत देखील गोड असते.
पण ज्याचा(एखाद्या माणसाचा) जीव जिथे जडला असेल, तेच त्याला गोड वाटते.
द्राक्षा म्लानमुखी जाता,शर्करा चाश्मताम्‌ गता ।
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवङ्गता ॥

- सुभाषितांच्या रसाळपणापुढे द्राक्षे म्लान (मलूल) झाली, साखर गोठून तिचा खडा बनला आणि अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले.(सुभाषितांची गोडी ह्या सर्वांपेक्षा जास्त आहे.)