पृष्ठे

मौनं , कालविलम्बः च,प्रयाणं, भूमीदर्शनम् |
भृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

- गप्प बसणे (दुर्लक्ष करणे) , वेळ वाया घालवणे (काम वेळेत न करणे) , (मुद्दाम) दुसरीकडे निघून जाणे , जमिनीकडे बघत रहाणे (काळजीत पडल्यासारखे दाखवणे ) , भुवया चढविणे (रागाचा आव आणणे) आणि दुसरयाशीच बोलत रहाणे (वेळ नाही असे दर्शविणे) ,नकार दाखविण्याचे हे सहा प्रकार आहेत.
भोजस्य भार्या मदविव्हलाया:
कराच्युतो हेमघटोपिपात्रम् |
सोपान मार्गेण प्रकरोति शब्दम्
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ||

- कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी जिन्यावरुन जात असताना तिच्या हातातील सोन्याचा घडा पडून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज झाला.
याच समस्यापूर्तीचे अजून एक सुभाषित येथे आहे.
मधुराम्ल लवण तिक्त कटु कषायश्च इति |
षड्रसा: पुरुषेणेहः भोक्तव्यां बलामिच्छिता ||

- ज्याला बळ (आरोग्य) कमवायचे आहे त्याने गोड (मधुर), आंबट (आम्ल) ,खारट (लवण), कडू (तिक्त) ,तिखट (कटु), तुरट (कषाय) या सहा रसांचे सेवन करावे.

शनै: कन्थः शनै: पन्थः शनै: पर्वतमूर्धनि |
शनै: विद्या शनै: वित्तम पञ्चैतानि शनै: शनै: ||

- घोंगडी विणणे , धर्मपालन , डोंगर चढ़णे , विद्याग्रहण आणि पैसा मिळवणे ह्या पाच गोष्टी हळू हळू कराव्यात.
शृङ्गार वीर करुणाद्भुत हास्य भयानक: |
विभत्स रौद्रौ शान्तस्य काव्ये नवरसा मता |

- शृंगार , वीर , करुण , अद्भुत ,हास्य , भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत हे काव्यातील (साहित्यातील) नवरस मानले जातात.
अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति नाम कौमारम् |
सद्भ्यो न रोचते सा असन्तोSप्यस्यै न रोचन्ते ||

- स्तुतिरुपी कन्या निवारण करण्यास कठीण असे कौमार्य अजूनही धारण करून आहे . कारण चांगल्या माणसांना ती आवडत नाही आणि वाईट माणसे तिला आवडत नाहीत .
विद्या विवादाय, धनं मदाय्, शक्ति: परेषां परिपीडनाय ।
खलस्य: साधो: विपरीतमेतद् ज्ञानाय, दानाय, च रक्षणाय ।।

- दुष्ट लोकांची विद्या वाद घालण्यासाठी , संपत्ती माज करण्यासाठी आणि शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असते.चांगल्या माणसांच्या बाबतीत मात्र ह्याच्या उलटे असते. त्यांची विद्या ज्ञानासाठी (स्वतःला ज्ञान मिळावे म्हणून) , संपत्ती दान करण्यासाठी आणि शक्ती इतरांच्या रक्षणासाठी असते.
येषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् |
तेषां चन्द्रबलं किं करोत्यम्बरे स्थितं देवः ||

- ज्यांच्याकडे बाहुबळ (शक्ती) नाही आणि मनोबलही नाही त्यांच्यासाठी आकाशात असलेले चंद्रबळ आणि देव तरी काय करणार? (ग्रह-तारे , नशीब यावर अवलंबून ना रहाता मन आणि शरीर यांची शक्ती वाढवावी हे उत्तम )
अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिर्दद्यात, देवो दुर्बल घातकम् ||

- देवापुढे, घोड्याला नव्हे हत्तीला नव्हे वाघाला तर नाहीच नाही पण बोकडाला बळी देतात.म्हणजे देवसुद्धा दुर्बल लोकांचा घातच करतो. (थोडक्यात दुर्बलांचा देवसुद्धा वाली नसतो .म्हणून दुर्बल नसणेच चांगले.)
अञ्जलीस्थानी पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा ||

- ज्याप्रमाणे ओंजळीतील फुले डाव्या अणि उजव्या दोन्ही हातांना सुगंधीत करतात, म्हणजेच त्यांचे डाव्या अणि उजव्या हातावर सारखेच प्रेम असते त्याप्रमाणेच सज्जन (चांगले) लोक दुष्ट आणि सज्जन अशा दोन्ही प्रकारच्या माणसांवर सारखेच प्रेम करतात.

येथे "सुमनसां" या शब्दावर श्लेष आहे ."सुमनसां" = फुलांचे आणि "सुमनसां" = चांगले मन असणारे (सज्जन लोक). यामुळे दुसऱ्या ओळीचे दोन अर्थ होतात. तसेच "वाम"(डावा) आणि "दक्षिण" (उजवा) हाताचे रूपक दुष्ट आणि सज्जन लोक यांच्यासाठी वापरले आहे.
अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्|
उदारमनसानां तु वसुधैव कुटुंबकम्||

- हे माझे हे दुसरयांचे असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार /खुल्या मनाच्या लोकांना तर सर्व जग/पृथ्वी हेच एक कुटुंब आहे असे वाटत असते .
अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||

- खूप खोल पाण्यात संचार करणारा रोहित मासा कधी गर्व करीत नाही.परंतु केवळ अंगठ्याइतक्या पाण्यात लहानशी शफरी मासळी मात्र सारखी फुरफुरत असते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते |
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि ||

- हे लक्ष्मणा , जरी लंका कितीही सोन्याने मढलेली असली तरी मला इथे (लंकेत) चैन पडत नाही, कारण आई आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत.
न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरङ्गो न कदापि दृष्टः।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥

- सोन्याचे हरीण याआधी ना कधी कोणी पाहिले ना कधी कोणी ऐकले. तरीही (अशक्य गोष्ट असूनही)रामाला त्याचा मोह झाला.विनाश जवळ आला असेल तर माणसाची बुद्धी फिरते हेच खरे.
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥

- क्षमा हे दुबळ्यांचे बळ आहे तर बलवानांचे भूषण आहे. क्षमा केल्याने सर्व जग वश होते.(अशाप्रकारे) क्षमेने काय साधत नाही?
यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती |
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती ||

- ज्या प्रकारे संगीत कैलास पर्वतापर्यंत नेते (येथे कैलास पर्वत हा अत्त्युच आनंद किंवा मोक्ष दर्शवत आहे ),त्या प्रकारे ना गंगा नेते ना सरस्वती .
यात संगीताचे महत्त्व सांगितले आहेच पण एका वेगळ्या प्रकारे.या सुभाषितातील दोन्ही ओळी पाहिल्या तर त्या सारख्याच आहेत असे दिसून येईल पण दोन्ही ओळींमध्ये शब्दांची फोड़ वेगळ्या प्रकारे केल्याने अर्थही वेगळा होतो.
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा।
विषं भवतु वा माऽभूत् फटाटोपो भयङ्करः ||

- साप विषारी नसला तरी त्याने फणा काढ़णे महत्वाचे आहे .विष असो वा नसों, उभारलेला फणा हा कायमच भयानक दिसतो.
आशा नाम मनुष्यणाम् काचिदाश्चर्यशृङ्खला |
यथा बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङगुवत् ||

-आशा ही अशी एक अजब साखळी आहे जिने बांधल्यावर माणूस धावत सुटतो आणि जिने सोडल्यावर पांगळ्याप्रमाणे एका जागी उभा रहातो.