पृष्ठे

हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।
 नीरक्षीरविवेके तु बकः बकः हंसः हंसः ||

- हंस पांढरा असतो आणि बगळा देखील पांढराच असतो. मग या दोघांमध्ये फरक काय? दूध आणि पाणी वेगळे करायची वेळ आल्यास मात्र हंस कोण आणि बगळा कोण हे ओळखू येते. (नीरक्षीरविवेक - म्हणजे दूध आणि पाणी एकमेकांपासून वेगळे करण्याचे कौशल्य हंसाकडे असते अशी समजूत आहे)
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ||

- कावळा काळा असतो आणि कोकिळ देखील काळाच असतो. मग दोघांमध्ये फरक तो काय ? वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कावळा हा कावळा आणि कोकिळ हा कोकिळ आहे हे ओळखू येते. 
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावहः ||

(श्रीमद्भगवद्गीता)

- स्वतःचा धर्म (स्वभाव किंवा सहज वृत्ती या अर्थाने) दुसऱ्याच्या चांगल्या आणि सहज वाटणाऱ्या धर्मापेक्षा कितीही कमी आणि दोष असलेला वाटला तरीही तोच चांगला असतो. स्वतःच्या धर्माचे पालन करताना मरण आले तरी ते उत्तम पण दुसऱ्याचा धर्म आचरणे हे अजूनच भयावह आहे.
सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् |
सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः स जीवति ||

-ज्याप्रमाणे गडद अंधारात दिवा दिसला की तो शोभून दिसतो (त्याचा योग्य उपयोग असतो) त्याप्रमाणेच दुःख अनुभवल्यानंतर मिळालेले सुख शोभून दिसते. खूप सुखाचा अनुभव घेतल्यानंतर मात्र ज्या माणसाला दारिद्र्य (दुःख) अनुभवावे लागते तो धडधाकट शरीराचा जिवंत माणूस असला तरी मेलेल्या माणसाप्रमाणे होऊन जातो.
 सत्सङ्गात् भवति हि साधुता खलानां साधूनां न हि खलसङ्गमात् खलत्वम् |
आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते मृद्गन्धं न हि कुसुमानि धारयन्ति ||

- चांगल्या संगतीमुळे दुष्ट लोकांच्या अंगी सज्जनपणा येतो. दुष्ट लोकांबरोबर राहिल्याने सज्जन लोकांच्या अंगी दुष्टपणा येत नाही. फूल खाली पडले असता त्याचा सुवास मातीला येतो. मातीचा वास फुलाला लागत नाही.
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ।।

- दान करणे , उपभोग घेणे आणि नाश होणे असे तीन मार्ग पैसा जाण्याचे आहेत. जो आपला पैसा दान करीत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही त्याचा पैसा कायम तिसऱ्या मार्गाने जातो. (नष्ट होतो)
यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |
निरस्तपादपे देशे एरण्डोsपि द्रुमायते ||

- जेथे खरोखर विद्वान लोक नसतात अशा ठिकाणी थोडीफार बुद्धी असलेल्यांचीही खूप स्तुती होते. ज्या देशात झाडेच नाहीत अशा देशात एरंडाला पण झाडाचा दर्जा मिळतो.
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

- दुष्ट माणसे आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. एकतर चपलेने त्यांना ठेचायचे किंवा त्यांच्यापासून लांब रहायचे.