पृष्ठे

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी
तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोSपि नागाननम् |
गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालोनलो
निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहाद् ईशोsपि हालाहलम् ||

- भुकेने व्याकुळ झालेल्या (शंकराच्या गळ्यातील) नागाला गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर खाण्याची इच्छा आहे. तर कार्तिकेयाचे वाहन मोर त्या नागाला खाऊ इच्छितो. पार्वतीचे वाहन सिंह कार्तिकेयाच्या मोराला खाऊ इच्छितो. पार्वती शंकराच्या जटेतील गंगेचा द्वेष करते तर त्याच्या कपाळावरचा अग्नी मस्तकावरील चंद्राला पाण्यात बघतो. अशाप्रकारे घरगुती भांडणांना वैतागलेल्या शंकराने - साक्षात देवाने देखील विष प्यायले.

शंकराने हलाहल प्यायले ह्या पौराणिक कथेचा संबंध त्याच्या घरातील भांडणाशी जोडला आहे. देवांना माणसाच्या भावभावना जोडून विनोदनिर्मिती केल्याची अशी बरीच उदाहरणे संस्कृत साहित्यात सापडतात.

२ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...


"कपालोनलो" -> कपाल-अनल -> कपालानलो. तो तिसरा अग्नि-स्रोत डोळा खालच्या दोन डोळ्यांना 'मी तुमच्यावर' म्हणून हिणवतो, त्यावर ते दोघे त्याला 'पण तो चन्द्र (कलानाथ) तुझ्याही वर' म्हणून डिवचतात. अत: 'कपालानल: कलानाथम् असूयति'.

"कुटुम्बकलहाद् ईशोsपि" -> कुटुम्बकलहादीशोsपि . गद्यलेखनात 'कुटुम्बकलहाद् ईशोsपि' चालेल, वा 'कुटुम्बकलहात् ईशोsपि' पण चालेल. जनार्दन हेगडे आणि इतर विद्वान गद्यलेखनात अनेकदा सन्धिनियम टाळतात, आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पण काव्यात मात्र नियमपालनात जास्त काटेकोरपणा अपेक्षित आहे.

> गिरिजासिंहोSपि नागाननम् (अत्तुं वाञ्छति) : पार्वतीचे वाहन सिंह कार्तिकेयाच्या मोराला खाऊ इच्छितो.
>
मी "गिरिजावाहोSपि नागाननम्" असा भेद वाचला आहे, आणि तो जास्त चांगला वाटतो. तो सिंह गणपतिला खाऊ इच्छितो आहे, मोराला नाही. नाग-अरि या अर्थानी मोराला 'नागारि' विशेषण आहे. 'नाग' या शब्दाचा अज़ून एक अर्थ म्हणजे 'हत्ती', आणि म्हणून 'नागानन' हे गणेशाचं एक नांव वा विशेषण आहे.

असाच एक पार्वतीनी शंकराची फिरकी घेतलेला गूगली-श्लोक (कस्त्वं शूली मृगय भिषजम् - असा आरम्भ) श्रीपाद अभ्यंकर यांनी सार्थ सादर केला आहे. तो अवश्य वाचावा. खूपच सुन्दर आहे. 'अत्तुं वाञ्छति' ही रचनाही उत्तम आहे.

- डी एन्

Naniwadekar म्हणाले...

माझ्यासारखा जगाला भस्मसात् करू शकणारा अग्नि इतका निकट असूनही चन्द्र स्वत:ची शीतलता सोडत नाही, असा विचारही त्या कपालानलाच्या असूयेमागे असू शकतो. खालचे दोन डोळे मिळून वरच्या डोळ्याला त्रास देताहेत, ही कल्पना नन्तर कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निधाली असेल. गौरी मात्र प्रत्येक स्त्रीची स्वत:च्या पतिच्या डोक्यावर बसण्याची शिरज़ोरीची इच्छा भलतीच स्त्री (जह्-नु--सुता गंगा) शिवाच्या डोक्यावर चढून पूर्ण करते आहे, म्हणून वैतागली आहे. तोच 'अमुकच्या वर तमुक' हा न्याय तिसरा डोळा आणि चन्द्र यांना लागू होतो.