पृष्ठे

अशनं मे , वसनं मे,जाया मे, बन्धुवर्गो मे ।
इति मे मे कुर्वाणं, कालवृको हन्ति पुरुषाजम्‌ ॥

- अन्न माझे, वस्त्रे माझी, बायको माझी आणि नातेवाईक माझे असे सतत माझे ,माझे (मे, मे) करणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा मारून टाकतो.

हा काव्यशास्त्रविनोदाचा एक प्रकार आहे. संस्कृतमध्ये मे म्हणजे माझे, तसेच बोकड मे मे असा आवाज करतो याचा उपयोग करून येथे "मे" वर श्लेष (pun) केला आहे.सतत "माझे माझे" करणाऱ्या माणसाला बोकडाची उपमा दिली आहे आणि त्याला शेवटी काळ धडा शिकवितो असे सूचित केले आहे.
रामाभिषेके जलमाहरन्त्या ,
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दम्‌,
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

- रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणताना एका तरुणीच्या हातातील सोन्याचा घडा खाली पडला (आणि) (तो) जिन्यावरून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज करत गेला.

हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे.यात शेवटची ओळ दिलेली असते आणि त्याला सुसंगत अशा पहिल्या तीन ओळी बनवणे अपेक्षित असते. कवीच्या शिघ्रकवीत्वाचा यात पुरेपूर कस लागतो.वरील श्लोकात ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ही ओळ समस्यापूर्तीसाठी दिलेली आहे. कवी कालीदास अशा समस्यापूर्ती करण्यामधे अतिशय पारंगत होता.
दधि मधुरम्‌ , मधु मधुरम्‌ ,द्राक्षा मधुरा,सुधापि मधुरमैव ।
तस्य तदेवही मधुरम्‌, यस्य मनो यत्र संलग्नम्‌ ॥

- दही गोड असते, मध गोड असतो,द्राक्षे गोड असतात आणि अमृत देखील गोड असते.
पण ज्याचा(एखाद्या माणसाचा) जीव जिथे जडला असेल, तेच त्याला गोड वाटते.
द्राक्षा म्लानमुखी जाता,शर्करा चाश्मताम्‌ गता ।
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवङ्गता ॥

- सुभाषितांच्या रसाळपणापुढे द्राक्षे म्लान (मलूल) झाली, साखर गोठून तिचा खडा बनला आणि अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले.(सुभाषितांची गोडी ह्या सर्वांपेक्षा जास्त आहे.)
गच्छ सूकर,भद्रं ते,वद ’सिंहो मया हत:’।
पण्डिता एव जानन्ति सिंहसूकयोर्‌ बल‍म्‌॥

- हे डुकरा,चालता हो, तुझे कल्याण असो."मी सिंह मारला" असे तू खुशाल सांग. (प्रत्यक्षात) सिंह आणि डुक्कर यांचे बळ किती हे सूज्ञ माणसे जाणतातच.
पिता रत्नाकरोर्यस्य लक्ष्मीर्यस्य सहोदरी I
शंखो रोदिति भिक्षार्थे फलम् भाग्यानुसारत: II

- ज्याचा पिता रत्नाकर (खूप रत्ने असलेला म्हणजेच समुद्र) आहे आणि लक्ष्मी ज्याची बहीण आहे अशा शंखाला (शंख आणि लक्ष्मी हे दोघेही समुद्रातून उत्पन्न झाले अशी एक पौराणिक कथा आहे) मात्र भिक्षा मागत रडावे लागते , म्हणजेच शेवटी प्रत्येकाला आपल्या भाग्याप्रमाणे (कर्माप्रमाणे) फळ मिळते (जन्माप्रमाणे नाही).
गजभुजङ्गमयोरपि बन्धनं शशिदिवाकरयोर्ग्रहपीडनम्।
मतिमताञ्च विलोक्य दरिद्रतां, विधिरहो बलवानिति मे मति:II

- हत्तीला सापासारखा लहान प्राणी बांधून ठेवू शकतो (त्रास देऊ शकतो), सूर्य आणि चंद्राला ग्रह त्रास देतात (राहू आणि केतू या ग्रहांमुळे सूर्य आणि चंद्राला ग्रहण लागतं अशी समजूत होती).अशा बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी असलेली ही गरिबी (किंवा कमजोरी) पाहून शेवटी नशीब हेच सर्वात बलवान आहे असं मला वाटतं.(थोडक्यात, आपल्या शक्तीचा कोणीही गर्व करू नये कारण इतक्या बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांचे देखील नशीबापुढे काही चालत नाही)