पृष्ठे

साधोः प्रकोपितस्यापि मनो नायाति विक्रियाम्।
न हि तापयितुं शक्यं सागराम्भस्तृणोल्कया ||

- जसे समुद्राचे पाणी केवळ वाळलेले गवत वापरून तापत नाही तसेच इतर लोकांनी कितीही दबाव आणला तरीही द्रष्टया माणसांचे मन आपल्या योग्य निर्णयापासून ढळत नाही.
आरभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: |
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारभ्य चोत्तमजना: न परित्यजन्ति ||

- कामात अडथळे येतील या भीतीने कामच सुरू न करणारे लोक नीच (अतिशय कमी) प्रतीचे , काम चालू असताना मधेच अडथळे आले तर ते अर्धवट सोडून देणारे लोक मध्यम प्रतीचे तर कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून पुन्हा पुन्हा काम सुरू ठेवणारे लोक अतिशय उत्तम प्रतीचे असतात.
लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
नतु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ||

- प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, तहानेने व्याकूळ झालेला आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्याला एखाद्या वेळेस सशाचे शिंगही सापडेल. (अशा सर्व अशक्य वाटणार्या गोष्टीही कदाचित साध्य होतील) पण मूर्ख आणि हेकेखोर माणसाची समजूत कधीही घालता येणार नाही.
कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विन:।
मूर्ध्नि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा॥

- महान लोकांची अवस्था फुलांच्या गुच्छाप्रमाणेच दोन प्रकारची असू शकते. एकतर ती सर्व जगाच्या डोक्यावर दिमाखाने रहातात किंवा एकटीच वनात झुरून मरून जातात (नाश पावतात).
ह्यापेक्षा इतर कोणत्याही अवस्थेत रहाण्यासाठी आवश्यक असणारी तडजोड ते करत नाहीत.
इतरतापशतानि यदृच्छया
वितर तानि सहे चतुरानन |
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ||

- हे ब्रह्मदेवा , तुला हवे ते इतर शंभर ताप माझ्या वाट्याला दे . मी ते सहन करेन. पण अरसिक माणसाला कविता सांगण्याचा ताप मात्र माझ्या कपाळी कदापि लिहू नकोस! लिहू नकोस !! लिहू नकोस!!!
जिह्वे प्रमाणं जानीहि भाषणे भोजनेऽपि च |
अत्युक्तिरतिभुक्तिश्च सद्य: प्राणापहारिणी ||

- हे जिव्हे (जिभे) , खाताना आणि बोलताना आपल्या मर्यादा ओळख. अति बोलणे आणि अति खाणे ह्या दोन्ही गोष्टी जीव घेणाऱ्या आहेत.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मी: स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||

- संपत्तीमुळे आंधळ्या झालेल्या हे मूर्ख माणसा, संकटात सापडलेल्या माणसाला का हसत आहेस? लक्ष्मी (पैसा) एका ठिकाणी स्थिर रहात नाही यात विचित्र ते काय ? विहिरीवर ह्या रहाटाला लावलेला घडा बघ, रिकामा झालेला परत भरतो आणि भरलेला परत रिकामा होतो.