पृष्ठे

क्वचित् काणो भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता |
विरलदन्तः क्वचिन्मूर्ख: खल्वाटो निर्धनः क्वचित् ||

- तिरळा मनुष्य क्वचितच सज्जन असतो, गाणारी बाई (कलावंतीण) क्वचितच पतिव्रता असते, विरळ दात असलेला मनुष्य क्वचितच मूर्ख असतो आणि टक्कल पडलेला माणूस क्वचितच दरिद्री असतो.

८ टिप्पण्या:

Vinay म्हणाले...

ह्या श्लोकाचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता ह्या मागचा भाव समजणे गरजेचं आहे, असं वाटतं. कारण शाब्दिक अर्थावरून फार बोध होत नाही. म्हणजे, टक्कल पडलेला माणूस क्वचितच दरिद्री का असावा? टक्कल पडण्याचा आणि दौलतीचा संबंध काय आहे? हे कळणं गरजेचं आहे.

आश्लेषा म्हणाले...

बरोबर आहे. पण ह्या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीत काही तथ्य आहे किंवा नाही हे मला माहित नाही. कोणाला माहित असल्यास अवश्य ऐकायला आवडेल.
हे सुभाषित नुसते वाचायला गमतीशीर वाटते म्हणून इथे टाकले आहे.

mannab म्हणाले...

अशा सुभाषितासारख्या काही गमतीदार, क्वचित टोचणा-या वाटतील अशा म्हणी आहेत. उदा. पादो पण नांदो. या म्हणीचा संबंध कुणाशी जोडतात, हे मी येथे वेगळे सांगत नाही. परंतु याच्या मागे काही तथ्य आहे काय ? योग्य वाटले तरच कृपया उत्तर द्या.
मंगेश नाबर

आश्लेषा म्हणाले...

@mannab, ही म्हण मला आत्ताच तुमच्याकडून कळली. माझा म्हणींचा विशेष अभ्यासही नाही .त्यामुळे त्यात काही तथ्य आहे किंवा नाही मी सांगू शकत नाही.

Naniwadekar म्हणाले...

क्वचित् काणो भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता |
विरलदन्तो क्वचिन्मूर्खो खल्वाटो निर्धनः क्वचित् ||

आश्लेषाबाई : या श्लोकात एक छन्ददोष आहे. चारपैकी तीन चरणांत आठ वर्ण आहेत, आणि ते तीन चरण अनुष्टुभाचे नियम पाळतात. तिसर्‍या चरणांत मात्र नअ‍ू वर्ण आहेत. तिथे 'दन्तहीन: क्वचिन्मूर्ख:' प्रयोग घेतल्यास अनुष्टुभाची हानी होत नाही. तुम्ही लिहिलेल्या श्लोकात काही चूक आहे का, हा प्रश्न मी माझ्या अ‍ेका विद्‌वान मित्राला केला. (मला स्वतःला संस्कृत अजिबात कळत नाही.) त्याच्या म्हणण्यानुसार हा श्लोक त्याला नवीन आणि बहुतांश सुभाषितसंग्रहांत न घेतलेला असा आहे. व्याकरणद्‌ऋष्ट्या तो चूक आहे. विरलदन्त: क्वचिन्मूर्खः खल्वाटो ... असे शब्द हवेत. विसर्गानन्तर 'क' वा 'ख' ही व्यंजने आल्यास त्याचा ओ-कार होत नाही. त्यामुळे 'त: क्व' हे शब्द त्याच स्वरुपात हवेत. तिथे 'तो क्व' ही संधी चालत नाही. ते शब्द 'विरलदन्त: क्वचिन्मूर्खः खल्वाटो निर्धनः क्वचित्' असे हवेत. मग व्याकरणातला दोष नाहीसा होतो, पण छन्दहानी टळत नाही. 'वज्रहनुमान मारुती' मधेही अनुष्टुभाच्या चरणात नअ‍ू वर्ण घेतल्याची चूक सर्वज्ञात आहेच.

वेदांत मात्र गायत्री, अनुष्टुभ, जगति या सर्व छन्दांची प्रचंड प्रमाणात मोडतोड आहे. पण वैदिक काळानंतर लौकिक वाङ्‌मयात छन्दोबद्‌ध रचनेत खूप जास्त शिस्त पाळलेली दिसते.

पुढला प्रश्न विनयरावांनी म्हटल्याप्रमाणे श्लोकाच्या अर्थाचा. माझा मित्र म्हणतो ही या श्लोकात समाज़ात असलेले समज़ दिसतात. त्यामागे काही तर्कशास्त्र पाहू नये. टक्कल असणे हे सुबत्तेचे लक्षण आहे. तो समज़ भले खरा असेल वा खोटा. तसेच छोटे डोळे हे बुद्‌धीमत्तेचे निदर्शक मानले ज़ातात. त्यामागे म्हणे कारण हे की विद्‌येची देवता ज़ो गणेश त्याला गजाचे आनन आहे; आणि हत्तीचे डोळे बारीक असतात, हे आपण नेहमी पाहतोच.

आश्लेषा म्हणाले...

धन्यवाद नानिवडेकर काका,योग्य ते बदल केले आहेत.

Naniwadekar म्हणाले...

विरलदन्त सहसा मूर्ख नसतो अशीच समज़ूत आहे. 'दन्तहीन' हा शब्द 'अनुष्टुभात बसणारा' हे उदाहरण द्‌यायला म्हणून मी सहज़ वापरला. तिथे 'विरलदन्तो' ऐवजी 'विरलदन्त:' हा बदल हवा.

तुमचा १५-जून-२००८ चा लेख ('भैरवी') खूप आवडला. पण शैली अज़ून विकसित व्हायला, आणि असलेल्या शैलीतून काही वाचनीय घडत रहायला, हात लिहिता हवा हो. एरवी ती मिळालेली/मिळवलेली देणगी वाया ज़ाणार. चांगले लिहिणारेही दहा लेख लिहितात तेव्हा त्यातले २-३ धड ज़मतात. ७०-८० टक्के लेख ज़मायला माणूस शेक्सपीअर किंवा पु ल देशपाण्डेच हवा. तेव्हा वर्षाला २-३ लेख न लिहिता अज़ून लिहीत चला.

Naniwadekar म्हणाले...

या सुभाषितातली मला आवडलेली अ‍ेक गंमत ही की पहिल्या दोन पादांत अमुक व्यक्‌तिंमधे अमुक गुण (साधुत्व, पातिव्रत्य) नसतो असा सूर आहे. शेवटच्या दोन चरणांत मात्र अमुक व्यक्तिंत अमुक *दोष* (मूर्खपणा, निर्धनत्व) नसतो असा रोख बदलला आहे. सुभाषित वाचायला नक्कीच गमतीदार आहे.