पृष्ठे

अनेकशास्त्रं बहु वेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः |
यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

- शिकायला पुष्कळ शास्त्रे आहेत , खूप काही जाणण्यासारखे आहे पण काळ थोडा आहे आणि अडचणी भरपूर. म्हणून ज्याप्रमाणे हंस पाण्यापासून दूध वेगळे करून घेतो त्याप्रमाणे माणसाने जे काही सार असेल (उत्तम असेल) त्याची निष्ठेने उपासना करावी .
अफलानि दुरन्तानि समव्ययफलानि च |
अशक्यानि च वस्तूनि नारभेत् विचक्षणः ||

- निष्फळ होणारी, न संपणारी, केलेला खर्च आणि मिळालेले फळ सारखेच असणारी तसेच अशक्य असणारी कामे शहाण्या माणसाने हाती घेऊ नयेत.
निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलासः पयोगते किं खलु सेतुबन्धः ।।

-  दिवा विझल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग? चोर येऊन चोरी करून गेल्यानंतर सावधगिरी बाळगून काय उपयोग ? वय निघून गेल्यावर सुंदर स्त्रियांचा सहवास काय कामाचा? आणि पूर आल्यानंतर बांध घालून काय उपयोग?
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ती निघून गेल्यावर काही करून उपयोग नसतो. 
परिश्रमो मिताहारो भूगतौ अश्विनिसुतौ |
तावनादृत्य नैवाहं वैद्यमन्यं समाश्रये ||

-  भरपूर शारीरिक कष्ट आणि मोजका आहार हे ह्या पृथ्वीवरील दोन अश्विनीकुमार (वैद्य) आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर कोणत्याच वैद्याचा आश्रय घेत नाही. 
परोपदेशवेलायां शिष्टाः सर्वे भवन्ति वै |
विस्मरन्ति तु शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ||

- दुसऱ्यांना उपदेश करायची वेळ आली म्हणजे सगळेच शहाणे असतात. पण स्वतःचे काही काम असेल तर मात्र हे शहाणपण विसरतात.
क्वचिद् वीणावाद्यं, क्वचिदपि च 'हा हा ' इति रुदितं
क्वचिद् रामा रम्या, क्वचिदपि जराजर्जरतनुः |
क्वचिद् विद्वद्गोष्ठी , क्वचिदपि सुरामत्तकलहः
न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ||

-  कधी वीणेचे मधुर वादन तर कधी मोठमोठ्याने रडणे, कधी सुंदर स्त्रीमध्ये रमणे तर कधी म्हातारपणाने विकलांग झालेले शरीर, कधी विद्वान लोकांबरोबर चर्चा तर कधी दारूच्या नशेत केलेली भांडणे ,असे सर्व असताना हे जग अमृतासारखे आहे का विषासारखे - कोण जाणे? 
सुखस्य दुःखस्य न कोSपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा |
'अहं करोमि' इति वृथाSभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ||

-  सुख काय किंवा दुःख काय ते देणारा असा दुसरा कोणीतरी आहे असे म्हणणे चुकीचेच आहे. 'मी करतो /माझ्यामुळे होते' असा खोटा अभिमान आणि स्वतःच्याच कर्मामुळे हे जग दुःखी होते.
वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैर्तनूमार्जनं
भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |
पाठ्यं संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे
हा हा हन्त ! तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

(शुकान्योक्ति)

-पोपट म्हणतो - अत्यंत बुद्धिमान अशा मला येथे राजाकडे सोन्याच्या पिंजऱ्यात रहायला मिळत आहे. राजा स्वतःच्या कमळासारख्या हाताने माझे शरीर स्वच्छ करतो . मला येथे अत्यंत स्वादिष्ट आणि रसाळ असे डाळिंब खायला मिळते आणि अमृतासारखे पेय प्यायला मिळते. राजसभेत मी सतत रामाचे नाव पठण करीत असतो . (अशी सर्व सुखे असूनही) पण अरेरे! तरीही माझे मन मात्र माझा जन्म जिथे झाला त्या झाडाच्या ढोलीकडेच धाव घेत आहे. 
हस्ती स्थूलतनुः चाङ्कुशवशः किं हस्तिमात्रोSङ्कुशः ?
वज्रेणाभिहताः पतन्ति गिरयः किं शैलमात्रः पविः ?
 प्रज्ज्वलिते विनश्यति तमः किं दीपमात्रं तमः ?
तेजो यस्य विराजते स बलवान् स्थुलेषु कः प्रत्ययः ?

- हत्ती शरीराने मोठा असला तरीही एक लहानसा अंकुश वापरून वठणीवर येऊ शकतो पण कधी हत्ती अंकुशावर नियंत्रण ठेवू शकतो काय? वज्राने आघात केला असता मोठे पर्वत कोसळून पडतात पण पर्वत त्या शस्त्राचे काही वाकडे करू शकतो काय? दिवा लावला असता अंधार नष्ट होतो पण अंधारामुळे दिव्याचा नाश होतो काय? म्हणजेच ज्याच्याकडे तेज आहे तो बलवान ठरतो . नुसताच आकाराने मोठा असणाऱ्याच्या अधीन कोणी असत नाही .